सोमवार, ११ जुलै, २०११

पाउले चालली पंढरीची वाट...



वारकरी सांप्रदायाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे आज आषाढी एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तजनांच्या भक्तीने, विठूमाउलीच्या गजर आणि अभंग-ओव्यांनी अगदी न्हावून निघते.


टाळ-चीपळयांचा नाद करत, अबीर-गुलाल उधळत आणि विठू-रखुमाउलीच्या नामाचा गजर करत वारकरीची दिंडी जेव्हा विठ्ठलाच्या दरबारी 'पंढरीत' पोहचते तेव्हा माउलीच्या दर्शनासाठी आतुरलेला, कासावीस झालेला प्रत्येक भक्तगण अगदी धन्य धन्य होवून जातो. गळ्यामध्ये तुळशीमाळा, कपाळावर चंदनाचा टिळा आणि कमरेवर हात ठेवून आपल्या भक्तांसाठी उभ्या असलेल्या विठू माउलीचे ते गोजिरे सावळं, करुणामयी दिव्यरूप मनात साठवताना प्रत्येक भक्ताच्या डोळ्यांतून चंद्रभागा वाहू लागते..
 
संत ज्ञानेश्वर माउली, संत जनाबाई, सोपानदेव, मुक्ताई, संत कान्होपात्रा, तुकोबा, विठोबाशी एकरूप झालेल्या अशा अनेक संतांना जाणवलेलं विठुरायाचे रूप केवळ अलौकिक आहे! आपल्या माउलीला साद घालण्यासाठी, आपल्या प्रेमळ अशा माउलीच्या गुण गौरवासाठी  त्यांनी अनेक अभंग आणि ओव्या रचल्या.
 
आमच्या शाळेचा दरवर्षी आषाढी एकादशीला दिंडीचा एक उपक्रम होता. अगदी बालवर्गापासून ते दहावीपर्यंतच्या पूर्ण वर्गांची दिंडी आमच्या शाळेपासून ते प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणारया वडाळ्याच्या विठू रखुमाउलीच्या मंदिरापर्यंत निघत असे. 
या दिवशी सगळे हेवे-दावे विसरून सर्व मुले मुली एकत्र येवून विठू माउलीच्या भजनात गुंग होवून जात असत. सुरात सूर आणि फेर धरत, भजन म्हणत, लेझीम खेळत जाणाऱ्या आमच्या दिंडीला सर्व लोक अगदी कौतुकाने पाहत असत.  
 
आयुष्यात परत परत ही वारी अनुभवायची आहे, फेर धरून परत नाचायचंय आणि विठ्ठलाच्या नामात तल्लीन व्हायचय आणि एकदातरी माझ्या विठूला भेटायला मला पंढरीला जायचंय...



 
अभंग १: 

तुझ्या नामाचा लागला छंद |
रे विठ्ठल रे विठ्ठल रे विठ्ठल गोविंद ||धृ||
हरिहर नाम तुझे केशवा रूप तुझे |
सदा पाहता होई मना रे आनंद ||१|| 
पुंडलिकासाठी देवा उभा जगजेठी |
पाण्यामध्ये तुकोबाचे तारिले अभंग ||२|| 
काय मागो देवा आता सदा सदा तुझे गुण गाता |
नाम तुझे मुखी माझ्या राहू दे अखंड ||३||

 
अभंग २:

अबीर-गुलाल उधळीत रंग|
नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग ||धृ||
शिवू कैसे उंबरठ्याला आम्ही जाती हीन |
पाहू कसे रूप डोळा, त्यात आम्ही लीन |
उभे पायरीशी दंग, ऐकता अभंग ||१||
वाळवंटी गाऊ आम्ही,  वाळवंटी नाचू |
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू |
विठ्ठलाचे नाम घेवू , होवुनी नि:सग ||२||
आषाढी कार्तिकी, भक्तजन येती |
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती |
निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई |
चोखा म्हणे नाम घेता, भक्त होती दंग ||३||

|| बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ||  

२ टिप्पण्या: