'किती गोड दिसतंय ना पिल्लू'...पलंगावर गाढ झोपलेल्या त्या मांजरीच्या पिल्लाकडे पाहून मनातल्या मनात ती म्हणाली आणि खुदकन हसली. ते गच्च मिटलेले डोळे, इवलेसे गुलाबी नाक आणि झोपेत
मधूनच जांभई देणारी त्या पिल्लाची मुद्रा पाहून तिला आणखीनच हसायला आले. खूप आळशी झालंय पिल्लू, होणारच...त्याला शाळा आणि कॉलेज मध्ये थोडेच जावे लागणार आहे, आणि नंतर जॉब ची
सुद्धा फिकीर नाही. मस्त खा, आणि झोपा, कसली कसलीच चिंता नाही.
नाहीतर आपण माणसं, एक दिवस आपला असा जात नाही ज्या दिवशी कसली
काळजी नसेल कसलेही टेन्शन नसेल. मनातल्या मनात तिचे विचारचक्र
चालूच होते. त्या दिवशी जर आपण पिल्लूला घरी आणले नसते तर काय
झाले असते त्याचे? त्या आठवणीने तिच्या अंगावर काटा आला. थोड्याच दिवसांपूर्वी घडलेली घटना तिला आठवली... संध्याकाळ झाली होती, त्या दिवशी दिवसभर पाऊस कोसळत होता. ऑफिसमधून घरी येताना त्यांच्या बिल्डिंगच्या आवारात
कुडकुडत बसलेल्या पिल्लाकडे तिची नजर गेली. चिंब भिजलेले, गारठलेल, म्याव म्याव करत ते कसल्यातरी शोधात होते. इवलासा तो कासावीस जीव भर पावसात जीवाच्या आकांताने
ओरडत असलेला पाहून तिला कसेतरीच वाटले. तेवढ्यात त्यांच्या बिल्डींगमध्ये तळमजल्यावर राहणाऱ्या जोशी काकू तिला दिसल्या, तिने त्यांना आवाज देऊन विचारले, 'काकू, हे मांजराचे पिल्लू कुठून आले हो? सकाळपर्यंत तर नव्हते इथे.'
'अगं आज दुपारीच ते इथे आलंय, भरकटलय वाटत, आईला शोधत असेल त्याच्या नाहीतर चुकले असेल, जाईल ते...इति जोशी काकू.
तेवढ्यात शेजारच्या घरातून माने काकू बाहेर आल्या, तिच्याकडे पाहत त्या म्हणाल्या 'अगं, मी आज दुपारी बाजारात जाताना पाहिले होते ह्या पिल्लाची मांजरीन आई मार्केटच्या मेन रोडवर एका बसखाली चिरडून मेली आणि हे पिल्लू थोडक्यात वाचलंय,
बी. एम. सी. वाले ते मेलेले मांजर घेवून गेले,
तेव्हापासून ते त्याच्या आईला इकडे तिकडे शोधत फिरतंय.'
'अरेरे...बिच्चारे!!!' जोशी काकू त्याच्याकडे पाहून म्हणाल्या.
येणारे, जाणारे त्याच्याकडे पाहून फक्त हळहळत होते, पण त्याला आसरा द्यायला कुणीच पुढे येत
नव्हते. ती तशीच पुढे गेली, पण त्या पिल्लूचे विचार तिच्या मनातून जात नव्हते, 'त्या पिल्लूला घेवून जावे का घरी? पण घरात मांजर नेलेली आई बाबांना आवडणार नाही, आपल्याला तरी कुठे मांजर
पाळायला आवडते, पण ते बिच्चारे एकटे पडले होते,
रडत होते, भुकेलेले असेल कधीपासून'. जड मनानेच ती घरात शिरली. तिचा तो पडलेला
चेहरा पाहून, तिच्या आईने काळजीने विचारले, काय झाले गं? ऑफिसमध्ये खूप काम होते का?'
नाही गं, डोकं दुखतंय असे म्हणत ती डोळे मिटून शांत बसली. आई तिच्याजवळ येत म्हणाली फ्रेश हो पटकन, आणि जेवून झोप म्हणजे बरे वाटेल.
मूड नाहीयेय गं काहीच करायचा, ती म्हणाली. बर ठीक आहे शांत बस थोडा वेळ, आई असे बोलून कीचनमध्ये गेली. तिचे कशातच लक्ष लागत नव्हते, त्या छोट्याशा पिल्लाचे विचार तिच्या मनातून जात नव्हते. ते पिल्लू असेल का अजून कि गेले कुणीकडे,
ती झटकन उठली, खिडकीजवळ आली आणि कुतूहलाने खाली पाहू
लागली, पाऊस कमी झाला होता पण ते पिल्लू अजूनहि तिथेच बसले होते. एका निश्चयाने ती तिथून उठली आणि आईजवळ येत म्हणाली, ' आई आपल्या बिल्डींगच्या खाली एक मांजराचे पिल्लू येताना पाहिले, खूप भिजले होते गं ते, बिचारे एकटेच होते त्याची आईसुद्धा नाही' असे म्हणत तिने घडलेली
हकीकत आईला सांगितली. हे ऐकून तिच्या आईलासुद्धा त्याची दया आली. आई, आपण आणूया का त्याला घरी? तिने पटकन विचारले. अगं पण तुझे बाबा रागावतील ना, तुला
माहीतच आहे त्यांना असे प्राणी पाळायला बिलकुल आवडत नाही, आईने तेवढ्याच काळजीयुक्त स्वरात तिला सांगितले. 'आई, बाबांचा ओरडा मी खाईन पण
मला त्याला तशा अवस्थेत नाही सोडायचं किती निरागस आणि लहान आहे ते अजून. कुठे जाणार ते? आणिफक्त २-३ दिवसच त्याला ठेवून घेवू आणि नंतर त्याला सोडून देवू. आईला तिचे म्हणणे पटले होते, आईलाही त्याची तशी अवस्था बघवणार नव्हती, शेवटी आईच ती. आईची परवानगी मिळताच ती क्षणाचाही विलंब न करता झरकन
उठून खाली गेली. पिल्लाजवळ जावून तिने त्याला हलकेच पकडण्याचा प्रयत्न केला पण तेही कसले अवखळ तिच्याकडे जायलाच तयार नव्हते, पण तिनेही हार न मानता शेवटी त्याला पकडलेच आणि अलगद उचलून
घेतले, बिच्चारे भीतीने थरथरत होते. ती त्याला घरी घेवून आली, तिच्या आईने त्याला पुसण्यासाठी
एक स्वच्छ आणि जाड फडके दिले, तिने पिल्लूला व्यवस्थित पुसून काढले थोडा उबारा मिळताच त्याचे
ओरडणे कमी झाले, तिने मग त्याच्यासाठी छोट्याशा वाटीतून दुध आणले आणि त्याच्यासमोर ठेवले पण त्याने त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही. अगं, लहान आहे ते, त्याला चमच्याने दुध दे आई म्हणाली. ती गमतीने डोक्यावर हात मारत म्हणाली अगं हो न विसरलेच केवडूसे आहे हे त्याला अजून स्वतःहून खाता पिता पण येत नसणार. तिने मग त्याला चमच्याने दुध भरवण्याचा प्रयत्न केला पण तो हि निष्फळ झाला. घाबरलेलं असणार ते, त्याला सगळेच नवीन वाटतंय ना असे म्हणून तिने स्वतःच्या मनाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या पिल्लाला घरी आणल्यावर तिच्या
चेहऱ्यावरचे समाधान तिच्या आईला दिसले आणि तिचे कौतुकही वाटले. थोड्याच वेळात
तिचे बाबाही घरी आले आणि घरात शिरल्याशिरल्या नवीन पाहुणा पाहून भुवया उंचावून त्यांनी प्रश्न केला 'हे मांजर कुणी आणले घरी?' आई बाबांकडे पाहतच म्हणाली 'तुमच्या लाडक्या
लेकीलाच विचारा, बाईसाहेब घेवून आल्या त्याला '. बाबांचा ओरडा खाण्याच्या तयारीतच तिने मनातल्यामनात देवाचे नाव घेतले. 'बाबा, मी आणलंय त्याला' असे म्हणत तिने बाबांना परत एकदा सगळी हकीकत
सांगितली. तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेले दिसले, आणि त्यांनी त्या पिल्लाकडे पाहिले,ते पिल्लू घाबरून निपचित त्या फडक्यावर बसले होते. ठीक आहे, पण दोनच दिवस ते घरात राहील आणि तोपर्यंत तुलाच त्याचे सगळे पाहावे लागेल, त्याने घरात घाण केलेली मला आवडणार नाही बाबांनी
घोषणा केली. बाबांचे हे वाक्य ऐकताच तिने आनंदानेच मान डोलावली. आणि बाबांनी सुद्धा पिल्लूला दोन दिवस का होईना पण घरात ठेवण्याची संमती दिल्यामुळे ती भलतीच खुश झाली होती मनातल्या मनातच
तिने देवाचे आभार मानले आणि त्या पिल्लाकडे कौतुकाने पाहिले त्याच्या डोळ्यात तिला कृतज्ञतेचे भाव दिसले. जणू त्याला तिचे खूप आभार मानायचे होते. पिल्लू थकल्यामुळे लगेच झोपी गेले होते. त्याने रात्री उठून काही गडबड करू नये म्हणून तिने त्याला एका मोठ्या बादलीत ठेवले, जेणेकरून ते त्यातून उडी मारून बाहेर येवू शकणार नाही. मगच तिला शांत झोप लागली होती.दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती उठली, जाग येताच पिल्लाच्या आठवणीने ती त्याच्याजवळ गेली, पिल्लू कालच्यापेक्षा जरा तरतरीत दिसत होते, त्याची भीती बऱ्यापैकी गेली होती आणि ते बसल्याजागीच सगळीकडे टकमक पाहत होते. भूक लागली असेल न पिल्लूला, लाडातच ती पिल्लुकडे पाहून म्हणाली आणि त्याला चमच्याने दुध भरवू लागली यावेळेस मात्र त्याने ते चटाचटा पिऊन टाकले, तिला खूप बरे वाटले. तिने मग त्याला आंघोळ घालायचे ठरवले आणि त्याच्या नादात ती स्वतःला ऑफिसला जायचंय हेदेखील विसरून गेली, आईने आठवण करून देताच तिने भराभर सगळे आवरून घेतलं तोपर्यंत पिल्लू ने पूर्ण घरभर फिरून घर पाहून घेतले होते. मग तिने छान पैकी कोमट पाण्याने पिल्लूला आंघोळ घालून त्याला लहान बाळाप्रमाणे फडक्यात गुंडाळून ठेवले आणि ऑफिसला जाताना आईला त्याची काळजी घे आणि बाहेर सोडू नकोस हे सांगायला ती विसरली नाही.
क्रमश:...