शनिवार, १४ मे, २०११

मग काय उपयोग ......


स्टेशनजवळच्याच एका सी.सी. डी. च्या बाहेरील जागेमध्ये राज सिगारेट ओढीत बसला होता. मध्येच सी. सी. डी. च्या काचांमध्ये आपली जेल लावलेल्या केसांची स्टाईल निरखत होता आणि आपल्या स्पाईक कट केलेल्या त्या कोंबड्याच्या तुरयासारख्या केसांना व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत होता. काचेत निरखत असतानाच त्याला बाहेरून ४-५ मुलींचा घोळका जाताना दिसला, चोरट्या नजरेने तो सगळ्यांकडे बघत होता. त्यातल्या एकीचे लक्ष राजकडे गेलं आणि तिने हळूच बाकीच्या मुलींना खुणावले तसे त्यातल्या एकीने इंग्रजीमध्ये एक चांगलीच शिवी हासडली आणि सगळ्या राजकडे बघून खी: खी: ही: ही: करत हसत खिदळत पुढे निघून गेल्या.....

आपला उद्धार झाला असणार असे तो समजून चुकला आणि ओशाळला. संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते तरी अजून ती आली नव्हती. किती वेळ वाट पाहायची? ह्या मुलींचे नखरे संपतील तर ना...राज गुस्श्य्यातच बडबडत होता. वेळ घालवण्याकरता त्याने खिशातून मोबाईल काढला, मित्रांना फोन करावं तर सगळे शिव्या देत बसतील आणि आजकाल कुठे बेपत्ता झालाय? पोरगी मिळाली की दोस्तांना विसरला, अशा नको त्या प्रश्नांनी हैराण करतील म्हणून त्याने फोन करायचे टाळले आणि गेम खेळत बसला.

तेवढ्यात ती लांबून येताना दिसली. त्याने मग बारीक नजरेने रोखून पाहत आणि शायनिंग मारत आपला भलामोठा गॉगल डोळ्यावर ठेवून दिला. आणि आपण त्या गावचेच नाही असा आविर्भाव चेहऱ्यावर आणण्याचा तो प्रयत्न करीत होता. दुरूनच तिने पाहीले, ती हसली आणि जवळ आली. राजची एकच धांदल उडाली, अरे आपण दोघांनी कुठे जायचे आज हे काहीच ठरवले नाही, कुठे जायचे आता हिला घेवून वरळी सीफेस ला की बँडस्टँडला का आणि कुठे??? त्या विचारातच त्याने एक टॅक्सी थांबवली, राजने तिच्या चेहऱ्याकडे पाहत टॅक्सीवाल्याला विचारले बँडस्टँडला चलेगा क्या? टॅक्सी वाल्याने दोघांकडे पाहतच मानेने होकार दिला, ती आणि तो दोघेही गाडीत खेटून बसले, टॅक्सी भरधाव चालत होती....

माधुरी किती उशीर केलास गं?
अरे, मुद्दामच केला, काळोखात कुणी ओळखत नाही ना पटकन....हळू आवाजात माधुरी कुजबुजली.
माधुरी युक्ती छान आहे तुझी, पण मी मात्र किती वेळ वाट पाहत होतो तुझी, बोअर झालो ना बसून बसून, मला वाटले की ......
काय वाटले? की मी प्लान कॅनसेल करणार असेच ना ...अरे मागच्या वेळेला खरंच माझा नाईलाज झाला होता रे राजा...पण राज मला ना तुझं हे नाव नाही आवडत, टिपिकल ओल्ड हिरोसारखेच आहे जसे राजकुमार, राज कपूर....मला नाही आवडत ते.
राज : (कपाळावर हात मारत, आणि मनातल्या मनात मी काय बोलत होतो आणि ही काय बोलतेय, विषय बदलायचे ह्या मुलींकडून शिकावे) काय करणार? आमच्या आईने हौसेने ठेवले आहे ते, मलासुद्धा जास्त नाही आवडत, पण आपला जन्म आणि आपल्याला बारशाला मिळालेले नाव याला आपण जबाबदार कसे असणार नाही का...
माधुरी : पण मी ते बदलून टाकणार आहे, मी तुला प्रेमाने सुबोध म्हणेन.
राज :  आता राज आणि सुबोध यात काही संबंध आहे का? :(
माधुरी : ते काही नाही तुला माहितेय ना मला आपला मराठी अॅक्टर सुबोध किती आवडतो ते...
('मग जा त्या सुबोधशीच लग्न कर' असे राज म्हणणार होता पण मोठ्या प्रयत्नाने त्याने आपले शब्द रोखले)
तू मला त्याचा नवीन मूव्ही कधी दाखवायला नेणार आहेस? आणि तू मला कुठल्या नावाने हाक मारणार आहेस रे आपल्या लग्नानंतर?
राज : आपल्या भवितव्याचा मूव्ही व्हायची वेळ आलीय आणि काय गं तुला त्या सुबोधचा पिक्चर पाहायचं म्हणे...आणि मी ना तुला रोज वेगवेगळ्या नावाने हाक मारणार करीना, कतरिना, प्रियांका....ह्या सगळ्याजणी माझ्या फेवरेट हेरोईन्स आहेत, चालेल ना....
माधुरी : नको, नको त्यापेक्षा मला तू माझ्याच नावाने हाक मार आवडेल मला ते ;)
राज : हे बरय तुम्हा मुलींचे .....

असली निरर्थक बडबड चालली असतानाच एकदम ब्रेक लागून गाडी थांबली आणि तेवढ्या त्या लहानश्या धक्क्याने ही माधुरी राजच्या अंगावर सहज म्हणून कोसळली. पैशाची वाट पाहत असलेला टॅक्सीवाला समोरच्या छोट्या आरशातून हळूच पाहत होता आणि गालातल्या गालात हसत होता. राजच्या ते लक्ष्यात आले त्याने माधुरीला दूर करून, खिशातून पाकीट काढीत 'कितना हुआ?' असे म्हणून प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले. 'पचपन रुपया सहाब' टॅक्सीवाल्याने ठोकून दिले, राजने मीटर न पाहताच साठ रुपये त्याच्या हातावर टेकवले आणि त्याने दिलेली चिल्लर न पाहताच खिशात टाकून माधुरीसह उतरला. अंधार आणखीनच वाढला होता. तरी ते दोघे खडकावर बसायला गेले.

राजने तिला विचारले, 'माधुरी, आपण असं चोरून फिरतो, पिक्चरला जातो आणि घरी हव्या तशा थापा मारतो, हे जर तुझ्या मम्मीला कळले तर, ती काय करील गं?

माधुरी (घाबरून आणि एक आवंढा गिळून) : राजेश, अरे हे सगळे जर माझ्या आईला कळून आले तर.... तर ना ती मला उभी चिरून टाकेल,नाहीतर घरात कोंडून ठेवेल. 'बाsssप रे'....

राज : अस्स???

माधुरी : राज, तुझ्या बाबांना जर कळल आपला लग्नाचा बेत, तर ते काय करतील रे?'

राज :  बाबा काय करतील??? अगं मला पहिले घराबाहेर हाकलून लावतील दर दर कि ठोकरे खायला आणि म्हणतील आधी स्वतःच्या पायावर उभे राहूनकमवायला आणि घर सांभाळायला शिका आणि मग हे असले उद्योगधंदे करा :(

माधुरी : राज तुला जर घराबाहेर काढले तर माझे कसे होणार रे? मलाही तुझ्यासोबत असेच ठोकरे खायला नेणार का तू? नको रे बाबा....मला भीती वाटते रेराज. असे म्हणून माधुरी ने त्याच्या खांद्यावर मान टाकली.

राज : अगं अशी भितेस का? आपल्या जवळ खूप आयडीआ आहेत. डरो मत, मी आहे ना. असे म्हणून राजने तिला जरा थोपटल्यासारखे केले तेव्हा कुठे जरा तिच्या जीवात जीव आला आणि तिने डोळे उघडले तो तिच्या एकदम लक्षात आले की अंधार खूपच वाढला आहे आणि इतक्या उशिरापर्यंत दोघांनी त्याखडकावर बसने धोक्याचे आहे. दोघे जड मनाने उठले आणि टॅक्सी करून घरी गेले.

दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे नेहमीच्या ठिकाणी, ठरलेल्या वेळेस ते दोघे भेटले.  माधुरी : राज अरे, माझ्या बाबांच्या बोलण्यावरून असे वाटतंय कि ते माझे लग्न ठरवण्याच्या भानगडीत आहेत...जर माझे लग्न दुसरयाच कोणाशी तरी ठरले तर मी काय करू रे? तू मला सोडवायला येशील ना? आपण आपल्या भावी आयुष्याची किती स्वप्ने रंगवली आहेत राज....
राज : माधुरी, असे तुला फक्त वाटतंय ना! अजून ठरले तर नाही ना.
माधुरी : मग तू काय माझे लग्न होण्याची वाट पाहतो आहेस का? की माझ्या लग्नाला जेवायला येण्याचा तुझा बेत आहे? (माधुरी लटका राग आणून राज ला बोलत होती)

राज : तसे नाही गं (राज समजावण्याच्या स्वरात म्हणाला) हे बघ जर थोडे दिवस तू त्यांच्या सांगण्यानुसार वाग आणि जर तुझा हा तर्क खरा ठरलाच, तर आपण पळून जायचा प्लान करू आणि मग लग्न करू. पण तू घाबरू नकोस. माधुरी मोठ्या खुशीतच घरी आली. तिने ठरवले कि आता राजचेच ऐकायचे. दुसरया दिवशी तिचे बाबा बँगलोरवरून ठरल्यापेक्षा एक दिवस आधीच आले. त्यांच्यासोबत कुणीतरी एक बावळटसा तरुण होता. त्याला नोकरीला लावण्यासाठी ते सोबत घेवून आले होते, पण माधुरीला या गोष्टीची कल्पना नव्हती.  तिच्या  बाबांनी त्याची ओळख माधुरीच्या आईशी करून दिली. आणि मग तिघेही चहा, खाण्यात, आणि गप्पांमध्ये दंग झाले.

माधुरी रात्रभर राजच्या आणि स्वतःच्या लग्नाबद्दल आणि भविष्याबद्दल विचार करीत बसली होती त्यामुळे सकाळी तिला उशिराच जाग आली. उठल्याबरोबर हॉलमधून बाबांचा आवाज येत होता, बाबा आले असणार हे ओळखून माधुरी धावतच त्यांना भेटायला खाली आली. तिथेच तिच्या बाबांसोबत आलेला तो तरुण तिला दिसला. त्याला पाहताच माधुरीच्या मनात शंका येवू लागल्या. 'ये बेटा, तुझी ओळख करून देतो' बाबांच्या आवाजाने माधुरी भानावर आली. बाबांच्या या शब्दांमध्ये काहीतरी कावा असणार असे तिला वाटले. बाबा ह्याच्याशीच आपले लग्न ठरवणार असतील, आपण आता धीटपणे वागले पाहिजे, ती एकदम म्हणाली, 'समजला आहे मला तुमचा डाव. प्राण गेला तरी मी याच्याशी लग्न करणार नाही. माझे राज वर प्रेम आहे. आणि आम्ही दोघांनी लग्न करायचे ठरवले आहे. हे ऐकून बाबा अवाक झाले तिच्या आईला तर काहीच कळेना, पोरीला वेडबिड तर नाही ना लागले, इतके दिवस कसे हिने आपल्याला काहीच कसे कळू दिले नाही अगदी शहाण्यासारखे वागत होती आणि आता मध्येच हिला काय झाले?  दोघांनी तिला आपल्या बेडरूम मध्ये नेऊन नीट विचारले आणि तिचे सर्व म्हणणे ऐकून घेतले.


माधुरी दुसऱ्या दिवशी धावतच ठरलेल्या ठिकाणी रडवेल्या चेहऱ्यानेच राजला भेटायला गेली. राज खूप अधिरतेने माधुरीची वाट पाहत होता. काल असे काय झालय की  ही खूप टेन्शनमध्ये वाटत होती. फोन वर सुद्धा नीट धड बोलली नाही. तिच्या घरी कळले तर नसणार ना...तेवढ्यात माधुरी आली.
राज : काय झाले माधुरी...तू एवढी दु:खी का वाटतेयस, काय झाले घरी? आपल्याबद्दल काही कळले का? घरी तुला ओरडा पडला का? की लग्नाबद्दल काही झाले?
माधुरी : राज, सगळे संपले रे... :(
राज : अगं असे कोड्यात बोलू नकोस प्लीज, काय झाले ते खरे खरे सांग पटकन. !!
माधुरी : तू सांगितल्याप्रमाणे मी अगदी जय्यत तयारी केली होती मनाची, धीट बनले होते. मी आई आणि बाबांना ठणकावून सांगितले मला लग्न करायचे आहे ते राजशीच, दुसऱ्या कोणाशीही नाही. मला वाटले आता स्फोट होणार, पण मम्मी म्हणाली...'राज? म्हणजे आमच्या क्लब मधल्या गौरीबाईंचा मुलगा ना? वा: छानच आहे मुलगा, बर का हो दोघांचा जोडा मस्तच दिसेल'. असे म्हणून तुझे सर्व वर्णन आईने बाबांना सांगितले. मग दोघांनीही सांगितले, 'खुशाल कर त्याच्याशी लग्न.'


राज : खरच माधुरी??? (अतिशय आनंद झाल्यामुळे राजने एक उडी मारली), पण माधुरी तुला एवढे रडकुंडीला यायला काय झाले?


माधुरी : राज, अरे माझी पूर्ण निराशा झाली. आपल्या सगळ्या बेतावर पाणी पडले. ते पळून जाणं नाही, कसले विघ्न नाही, ते उपाशी ठेवणे, कोंडून ठेवणे तसले काही काही नाही. असले कसले लग्न? नो थ्रिल!!! धडधडणे नाही, थरथरणे नाही, सगळेच कसे बोगस! प्रत्येक संकटावर तू किती निरनिराळ्या युक्त्या काढल्या होत्यास. पण ... पण आता काय साधं सरळ लग्न...मग त्यात काय उपयोग....? :( 
:-) :-) :-) :-)




टीप - ही कथा १९७५ साली बाबांनी लिहिली होती. त्यांची डायरी वाचता वाचता मला मिळाली आणि त्यात थोडेफार बदल करून आपल्या वाचनासाठी इथे देत आहेत. :)